धुळ्यात 15 जानेवारी रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन 5 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

*धुळे : दिनांक 1 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्त);* जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. त्यानुसार माहे जानेवारी महिन्याचा महिला लोकशाही दिन 15 जानेवारी,2024 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे येथे आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती राजेंद्र बिरारी, सदस्य सचिव महिला लोकशाही दिन तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, धुळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

याकरीता लोकशाही दिनाच्या 15 दिवस अगोदर म्हणजेच 5 जानेवारी,2024 पुर्वी अर्ज सादर करणे अपेक्षित आहे. अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्लॉट नं. 52, जयहिंद कॉलनी, देवपुर, धुळे येथे मिळतील. अर्ज विहित नमुन्यातील असावा, तक्रार/निवेदन हे अर्जदाराचे वैयक्तिक असावे. तसेच न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषय अर्ज/तक्रार/निवेदन स्विकारले जाणार नाहीत. असे श्री. बिरारी यांनी कळविले आहे.

000000

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.